ठाण्यात विकासाच्या नावाखाली वृक्षसंहार; पुनर्रोपणावर पडदा, हजारो झाडांचे भवितव्य अंधारात

0
87
ठाण्यात विकासाच्या नावाखाली वृक्षसंहार; पुनर्रोपणावर पडदा, हजारो झाडांचे भवितव्य अंधारात
ठाण्यात विकासाच्या नावाखाली वृक्षसंहार; पुनर्रोपणावर पडदा, हजारो झाडांचे भवितव्य अंधारात

ठाण्यात विकासाच्या नावाखाली वृक्षसंहार; पुनर्रोपणावर पडदा, हजारो झाडांचे भवितव्य अंधारात

ठाणे शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील वृक्षतोड प्रकरणामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच, गेल्या दीड ते दोन वर्षांत शहरात विकास प्रकल्पांच्या नावाखाली अक्षरशः हजारो झाडांची कत्तल झाल्याचे चित्र समोर आले आहे. बांधकाम प्रकल्प आणि विविध पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने शहराची हरित ओळख धोक्यात आली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना अडथळा ठरणाऱ्या सुमारे ३,००० ते ३,५०० झाडांच्या तोडीसाठी ठाणे महापालिकेने परवानग्या दिल्या आहेत. मात्र, या तोडीमुळे बाधित झालेल्या वृक्षांच्या पुनर्रोपणाबाबत नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, हे रोपण कुठे झाले आणि लावलेली रोपे सध्या जिवंत आहेत की नाहीत, याबाबत महापालिका वर्तुळात कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचे दिसून येते.

खाडीच्या एका बाजूने आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दुसऱ्या बाजूने वेढलेले ठाणे शहर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध मानले जाते. शहरातील अनेक भागांत आजही जुने वृक्ष आणि हरित पट्टे अस्तित्वात आहेत. मात्र, झपाट्याने वाढणारी नागरी वस्ती आणि विकास प्रकल्पांमुळे या हिरव्या संपत्तीवर सातत्याने कुऱ्हाड चालवली जात आहे.

यापूर्वीही वृक्ष प्राधिकरणाच्या परवानग्यांवर वाद निर्माण झाले होते. प्रत्येक झाडासाठी ठराविक ‘दर’ आकारून परवानग्या दिल्या जात असल्याच्या चर्चांनी शहरात खळबळ उडवली होती. या प्रक्रियेत महापालिकेचे वृक्ष व उद्यान विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. गेल्या काही वर्षांत प्रशासकीय काळात या वृक्षतोडीला अप्रत्यक्ष राजाश्रय मिळाल्याचेही आरोप होत असून, ठाण्यातील पर्यावरण रक्षणाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here