राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी विभागनिहाय निवडणूक प्रभाऱ्यांची नियुक्ती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका २०२५–२६ साठी विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून मान्यवर नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांद्वारे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर अशा प्रमुख महानगरपालिकांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
या यादीत माजी मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांचा समावेश असून, प्रत्येक विभागात निवडणूक नियोजन, संघटनात्मक बांधणी, उमेदवार निवड प्रक्रिया आणि प्रचार यांची धुरा हे प्रभारी सांभाळणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या नियुक्त्यांद्वारे पक्ष संघटन अधिक बळकट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांत पक्ष मजबूत तयारीसह उतरल्याचा स्पष्ट संदेश या नियुक्त्यांमधून दिला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


