ज्येष्ठ शिक्षणसेविका सुशीला जोशी यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर
तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण व बालसंस्कार क्षेत्रात अनेक दशके मोलाचे योगदान देणाऱ्या देवगड येथील ज्येष्ठ शिक्षणसेविका श्रीम. सुशीला दिनकर जोशी यांना शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
०१ एप्रिल १९३२ रोजी जन्मलेल्या श्रीम. जोशी यांनी देवगड कन्या शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. देवगड तालुक्यात लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही औपचारिक व्यवस्था नसताना, ग्रामस्थांच्या विनंतीवरून त्यांनी सन १९६६ च्या सुमारास बालसंस्कार केंद्राची स्थापना केली. या केंद्रामुळे देवगड परिसरात शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
वैयक्तिक लक्ष, शिस्तबद्ध व विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील लेखन, वाचन व मूलभूत कौशल्यांचा त्यांनी भक्कम पाया घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजारहून अधिक विद्यार्थी घडले, जे आज डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. डॉ. सुनील आठवले, अॅड. शामसुंदर जोशी, तसेच प्रसिद्ध व्यापारी प्रमोद नलावडे हे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये उल्लेखनीय आहेत.
जवळपास ३५ ते ४० वर्षे त्यांनी अखंडपणे शिक्षणसेवा दिली. लोकांच्या सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वीपणे पार पाडता आले, असे त्या विनम्रपणे सांगतात. आजही त्या विद्यार्थ्यांना स्वअध्ययन, स्वशिस्त व स्वावलंबनाचा संदेश देत असून, ९३ व्या वर्षीही स्वावलंबी जीवन जगत नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
शिक्षण, संस्कार व समाजघडणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव समीर परब आणि महिला आघाडी अध्यक्षा सुष्मिता चव्हाण यांनी केली.


