मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे ५५ टक्के काम पूर्ण; आतापर्यंत ८४ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च
मुंबई l प्रतिनिधी :
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असलेल्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ८४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला असून, एकूण अपेक्षित खर्च सुमारे १.०८ लाख कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रस्तावित हा बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर उभारण्यात येणारी बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणार असून, प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या विविध टप्प्यांवर पायाभूत सुविधांचे काम, खांब उभारणी, वायाडक्ट, पूल, बोगदे तसेच स्टेशन उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
रेल्वे मंत्रालय आणि नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. जपानच्या सहकार्याने अत्याधुनिक शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन व बांधकामाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
या प्रकल्पामुळे मुंबई–अहमदाबाद दरम्यानचा प्रवास अवघ्या २ ते अडीच तासांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या रस्ते किंवा पारंपरिक रेल्वेमार्गाने हा प्रवास करण्यासाठी जास्त वेळ लागतो. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच व्यावसायिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे हजारो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळत आहे. आधुनिक वाहतूक व्यवस्था, सुरक्षित प्रवास आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यामुळे हा प्रकल्प भारताच्या पायाभूत विकासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, उर्वरित काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून, येत्या काही वर्षांत या ऐतिहासिक प्रकल्पाची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारत जागतिक दर्जाच्या हाय-स्पीड रेल्वे राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


