खारेपाटणमध्ये वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन
जखमी माकड पिंजऱ्यात जेरबंद
खारेपाटण l प्रतिनिधी
खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ परिसरात सोमवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या वर्दळीच्या घाटी रस्त्यावर एक माकड मृत अवस्थेत तर दुसरे जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक खारेपाटण येथे दाखल झाले.
वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत जखमी माकडाला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. या कारवाईमुळे शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
घटनेनंतर परिसरात दक्षता वाढवण्यात आली असून, वनविभागाकडून पुढील आवश्यक वैद्यकीय तपासणी व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


