खेड बसस्थानकात महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

0
263
खेड बसस्थानकात महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
खेड बसस्थानकात महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

खेड बसस्थानकात महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

खेड l प्रतिनिधी
खेड येथील बसस्थानक परिसरात दागिन्यांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अवघ्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा महिला प्रवाशाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या ताज्या घटनेत एका महिलेचे सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली आहे. सलग घडलेल्या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला खेड बसस्थानकातून खेड–मंडणगड एसटीमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या बॅगेची चेन उघडून आत ठेवलेले दागिने चोरले. यात २ लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तसेच ५ हजार २०० रुपयांची रोकड असा ऐवज आहे.

बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच पर्समधील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेला मोठा धक्का बसला. तिने तातडीने खेड पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सहा दिवसांपूर्वीही खेड बसस्थानकातून एसटीमध्ये चढणाऱ्या एका महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. सलग दोन घटनांमुळे बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांनी सतर्कता वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here