संगमेश्वर रोड स्थानकाला पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचा अधिकृत थांबा

0
71
संगमेश्वर रोड स्थानकाला पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचा अधिकृत थांबा
संगमेश्वर रोड स्थानकाला पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचा अधिकृत थांबा

संगमेश्वर रोड स्थानकाला पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचा अधिकृत थांबा

 नागरिकांचा जल्लोषात ऐतिहासिक स्वागत सोहळा

संगमेश्वर l प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्याच्या रेल्वे प्रवासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण संगमेश्वरवासीयांनी अनुभवला. पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर झाल्यानंतर, या गाड्यांचे भव्य आणि जंगी स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

पहिल्या दिवशी पोरबंदर एक्सप्रेस संगमेश्वर रोड स्थानकावर दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि जल्लोषात नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी जामनगर एक्सप्रेसचेही तितक्याच उत्साहात स्वागत करण्यात आले. सलग दोन दिवस रेल्वे स्थानक परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

या ऐतिहासिक यशामागे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, आंदोलने, उपोषणे आणि लोकशक्तीचा मोठा सहभाग महत्त्वाचा ठरला. संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी लढा देणाऱ्या सर्व कार्यकर्ते, नागरिक तसेच पत्रकार संदेश सुरेश जिमन यांच्या योगदानाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील नागरिकांना आता थेट गुजरातकडे प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि भाविक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार असून, जलद आणि सुलभ प्रवास शक्य झाल्याने प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय दूर होणार आहे.

या संघर्षात निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे समीर सप्रे, दीपक पवार, जगदिश कदम, गणपत दाभोळकर, रुपेश कदम, अशोक मुंडेकर, जी. झेड. टोपरे, मंगेश बाईत यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. हा विजय संघर्षकाळात पाठबळ देणाऱ्या संपूर्ण तालुक्यातील जनतेचा आहे, अशी भावना यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here