रुग्णालयात अन्यायाचा उद्रेक
मालवण I प्रतिनिधी
मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या आरोग्यसेवेपेक्षा अधिक गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे तो म्हणजे रुग्णालय स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांच्या उपजीविकेचा. गेली तब्बल चार महिने या कामगारांना मानधन मिळालेले नाही. ज्या हातांवर रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णांचे आरोग्य आणि संपूर्ण यंत्रणेची नीटनेटकी व्यवस्था अवलंबून आहे, त्या हातांमध्ये आज असंतोष, नैराश्य आणि उपासमारीची भीती स्पष्टपणे दिसत आहे.
हे कामगार केवळ कर्मचारी नाहीत तर त्यांच्या मागे संपूर्ण कुटुंबे उभी आहेत. चार महिने पगार न मिळाल्याने अनेकांच्या घरात चुल पेटलेली नाही. काहीजण भाड्याच्या खोल्यांमध्ये राहत असून घरमालकांनी थकबाकीमुळे खोली रिकामी करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. अशा परिस्थितीत हे कामगार रोज रुग्णालयात येऊन आपले कर्तव्य बजावत आहेत, हेच मुळात या व्यवस्थेवरचा कठोर सवाल आहे.
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका कुलमचा वांड आणि नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. त्यांनी थेट वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पॉल आणि डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा करत जाब विचारला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते आणि कामगारांच्या प्रश्नांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडण्यात आली.
कंत्राटदाराला थेट प्रश्न विचारण्यात आला की जर कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन देण्याची क्षमता नसेल तर ठेका स्वीकारलाच कशासाठी. कंत्राट घेताना अटी मान्य केल्या जातात, जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात, मग त्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याचा अधिकार कुणी दिला. कर्मचाऱ्यांचे मानधन वेळच्या वेळी जमा झाले पाहिजे, हा कोणताही उपकार नाही तर त्यांचा हक्क आहे. या हक्कावर गदा आणणारी ही व्यवस्था कोणाच्या मर्जीने चालू आहे, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या कामगारांची अवस्था उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचली असताना प्रशासन मात्र गप्प आहे. जर आज या कामगारांनी काम बंद केले तर रुग्णालयाची अवस्था काय होईल, याचा विचार कुणी केला आहे का. स्वच्छतेअभावी एखाद्या रुग्णाला संसर्ग झाला, एखाद्या पेशंटची प्रकृती बिघडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. सफाई कामगार हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे, हे विसरून चालणार नाही.
पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जर कंत्राटदार मानधन देऊ शकत नसेल तर तात्काळ कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नेमावा. कामगारांचे पोट रिकामे ठेवून आरोग्य सेवा चालू ठेवण्याचा ढोंगीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामगारांचे हाल, त्यांच्या कुटुंबांचे अश्रू आणि मुलांचे उपाशी चेहरे या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे.
सफाई कामगार रोज रुग्णालयातील घाण साफ करतात, रक्त, कचरा, संसर्गजन्य साहित्य हाताळतात. एखादी चूक झाली, एखादा अपघात झाला, तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. तरीही हे कामगार निष्ठेने काम करत आहेत, कारण त्यांना आपल्या कामाचे महत्त्व माहीत आहे. पण या निष्ठेची किंमत त्यांना उपासमारीने मोजावी लागते, ही लाजिरवाणी बाब आहे.
ही केवळ मानधनाची लढाई नाही, तर माणुसकीची लढाई आहे. प्रशासनाने डोळे उघडून पाहावे. कामगारांना तात्काळ थकीत मानधन अदा करावे आणि पुढे एकही महिना उशीर होणार नाही, याची लेखी हमी द्यावी. अन्यथा हा प्रश्न रस्त्यावर येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि कंत्राटदाराची असेल. मालवण ग्रामीण रुग्णालयातील ही परिस्थिती संपूर्ण यंत्रणेला आरसा दाखवणारी आहे आणि हा आरसा आता दुर्लक्षित करून चालणार नाही.


