शिरगाव हायस्कूल नूतनीकरणासाठी साटम कुटुंबियांची १.५१ लाखांची मदत
कै. ॲड. शिवाजी साटम यांना भावपूर्ण आदरांजली
शिरगाव l प्रतिनिधी
शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी चेअरमन आणि शिक्षणप्रेमी कै. ॲड. शिवाजी साटम (भाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजली कार्यक्रम शिरगाव हायस्कूलच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साटम कुटुंबियांच्या वतीने शाळेच्या वर्गखोल्यांच्या नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेस संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले, कार्याध्यक्ष ॲड. पी. व्ही. साटम, उपाध्यक्ष संभाजी साटम व विजय जाधव, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, खजिनदार श्री. फाटक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, संस्था पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, साटम कुटुंबीय, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कै. शिवाजी साटम यांच्या कार्याची आठवण करून देत संस्थेच्या जडणघडणीत व शाळेच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांची तळमळ, सामाजिक बांधिलकी आणि दूरदृष्टी यामुळे अनेक पिढ्यांचे भवितव्य घडले, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कै. शिवाजी साटम यांचे धाकटे बंधू आणि संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. पी. व्ही. साटम यांनी साटम कुटुंबियांच्या वतीने शाळेतील वर्गखोल्यांच्या नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले यांच्याकडे सुपूर्द केला. दुःखाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी दिलेल्या या मदतीबद्दल संस्थेच्या वतीने साटम कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


