कोटक सिक्युरिटीजच्या तांत्रिक बिघाडावरून वाद
1.75 कोटी नफ्यावर मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका
मुंबई l
कोटक सिक्युरिटीजच्या तांत्रिक बिघाडामुळे एका ट्रेडरने फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) व्यवहारात 1.75 कोटी रुपयांचा नफा कमावल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या बिघाडामुळे संबंधित ट्रेडरला 40 कोटी रुपयांचे मार्जिन वापरण्याची संधी मिळाल्याचे समोर आले आहे.
कोटक सिक्युरिटीजने काही वेळातच ते 40 कोटी रुपयांचे मार्जिन परत घेतले, मात्र त्यासोबतच ट्रेडरने कमावलेला 1.75 कोटी रुपयांचा नफाही परत मागितला. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, कंपनीला दोन्ही गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. जर या व्यवहारातून नुकसान झाले असते, तर त्याची जबाबदारी कंपनी स्वीकारू शकली नसती; अशा परिस्थितीत नफ्यावर मालकी हक्क सांगणे योग्य ठरत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार ट्रेडर श्री. राजगुरु यांना नफा ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या आदेशाविरोधात कोटक सिक्युरिटीजने अपील दाखल केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
दरम्यान, कोटक सिक्युरिटीजने हे प्रकरण तडजोडीत मिटवण्यासाठी ट्रेडरला त्याच्याच कमावलेल्या नफ्यातून 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच, उर्वरित 1.25 कोटी रुपयांवर कंपनीने दावा केल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे ब्रोकरेज कंपन्यांची तांत्रिक जबाबदारी, ट्रेडिंग सिस्टममधील जोखीम आणि गुंतवणूकदारांचे हक्क यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


