सौंदळ रेल्वे थांबा लाकायमस्वरूपी स्थानकाचा दर्जा कधी?
सौंदळ रेल्वे थांबा लाकायमस्वरूपी स्थानकाचा दर्जा कधी?
कोकण रेल्वेच्या लेखी आश्वासनानंतरही क्रॉसिंग स्थानकाबाबत हालचाल नाही
रत्नागिरी – सौंदळ l प्रतिनिधी
सौंदळ रेल्वे स्थानक सध्या हॉल्ट (थांबा) स्वरूपात असून, त्याचे कायमस्वरूपी स्थानक किंवा किमान क्रॉसिंग स्थानकात रूपांतर व्हावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने सौंदळ हॉल्टचे क्रॉसिंग स्थानकात रूपांतर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर बराच कालावधी लोटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने दिलेला शब्द पाळून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा तालुक्याच्या पूर्व परिसरातून व्यक्त केली जात आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात कोणता निर्णय घेतला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सौंदळ संदर्भात दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खा. नारायणराव राणे यांना निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती आहे. हॉल्ट स्थानक मापदंडानुसारच असल्याचा दावाकोकण रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सौंदळ हे हॉल्ट स्थानक असून मापदंडानुसार आवश्यक त्या प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सध्या प्रवाशांची संख्या पाहता गाड्यांना दिलेले थांबे पुरेसे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच सेवा-सुविधांमध्ये वाढ ही निधी उपलब्धतेनुसार व स्टेशन प्राधान्यानुसार टप्प्याटप्प्याने केली जाते. निधी उपलब्ध झाल्यास आवश्यक बाबींची पूर्तता करून सौंदळ हॉल्टचे क्रॉसिंग स्थानकात रूपांतर केले जाईल, असे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते.दीर्घ संघर्षानंतर मिळालेला हॉल्ट दर्जासौंदळ स्थानकासाठी ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. येळवण गावचे सुपुत्र, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अग्रणी प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने सौंदळ हॉल्टला मान्यता मिळाली आणि अवघ्या वर्षभरात स्थानकाचे काम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले. त्यावेळी दिवा–सावंतवाडी पॅसेंजरने सौंदळ येथे पहिला थांबा घेतला होता.राजापूर रोडनंतर तालुक्यात थांबा मिळालेले सौंदळ हे दुसरे स्थानक (हॉल्ट) ठरले आहे. सध्या येथे सकाळी सावंतवाडीकडून दिव्याकडे जाणारी व सायंकाळी दिव्याहून सावंतवाडीकडे जाणारी पॅसेंजर गाडी थांबते.प्लॅटफॉर्मअभावी प्रवाशांची गैरसोयसौंदळ येथे प्लॅटफॉर्म नसल्याने गाडीतून चढ-उतार करणे अतिशय कठीण ठरत आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि महिलांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक प्रवासी सौंदळऐवजी लगतच्या विलवडे स्थानकातून प्रवास करणे पसंत करतात. परिणामी सौंदळ स्थानकाचे प्रवासी व महसुली उत्पन्न कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर सौंदळ हॉल्टचे क्रॉसिंग किंवा कायमस्वरूपी रेल्वे स्थानकात रूपांतर करण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.