दापोली- क्रांतिज्योती तथा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे समारंभपूर्वक साजरी करण्यात आली.
दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड तसेच गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोघांनीही सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्त्री शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या सावित्रीबाई तसेच ज्योतिबा फुले यांच्या ऋणातून आपला समाज कधीच मुक्त होऊ शकणार नाही इतके या दोघांचेही कार्य मोठे आहे असे ते म्हणाले. यावेळी चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, रेखा ढमके आदी उपस्थित होते.