हत्ती व वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा
बांदा l प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या हत्ती आणि वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेती, फळबागा व मानवी जीवन धोक्यात आले असून याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाच्या वतीने येत्या आठ दिवसांत बांदा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाची अंतिम तारीख सर्व शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या बांदा येथील कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शासनाने हत्ती व वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवार उभे करण्याचाही निर्णय एकमताने घेण्यात आला.


