दिव्यांगांच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक – सचिव तुकाराम मुंढे
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित आणि संशोधनाधारित सर्वसमावेशक शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी सर्व स्तरांवर सामूहिक बांधिलकी आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केले. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डीफ (एनसीईडी) महाराष्ट्र आणि अली यावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित ‘दिव्यांगतेच्या दृष्टिकोनातून व संशोधनाच्या आधारे समावेशक शिक्षण’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अली यावर जंग संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार, एनसीईडीच्या अध्यक्षा डॉ. मीरा सुरेश, कॉक्लिआ संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, एनसीईडी महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा शुभदा बुर्डे, शिक्षण विभागप्रमुख डॉ. गायत्री आहुजा, शिल्पी नारंग आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. मुंढे यांनी समावेशक शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संशोधनावर आधारित, पुराव्यांवर आधारित धोरणे आणि कृती आराखडे आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षकांची भूमिका अत्यंत परिवर्तनकारी असून समावेशक धोरणे व कायदे प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विविध विभागांमध्ये समन्वय, संस्थात्मक सहकार्य, स्पष्ट उत्तरदायित्व व्यवस्था आणि पारदर्शक प्रशासन ही समावेशक शिक्षणाची यशाची गुरुकिल्ली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६, संविधानिक तरतुदी आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वत्रिक सुलभता, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. पालकांची सक्रिय भागीदारी, तंत्रज्ञानाधारित उपाययोजना, मानक कार्यपद्धती आणि सर्व भागधारकांचा सक्रीय सहभाग यामुळे सेवा वितरण अधिक सक्षम व परिणामकारक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. सुमन कुमार यांनी दिव्यांगता व समावेशक शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत, त्याच्या यशस्वी अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले. तर डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी समावेशक शिक्षणाची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशभरातून सुमारे ३५० प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. यामध्ये नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक तसेच विविध विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


