
डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई l प्रतिनिधी
पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ हे व्रतस्थ वैज्ञानिक म्हणून कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले की, डॉ. गाडगीळ यांनी पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, त्या संवेदनांना जिवंत ठेवणे आणि अधिक प्रगल्भ करणे हे त्यांच्या जीवनकार्याचे केंद्रबिंदू होते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले.
डॉ. गाडगीळ यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने २०२४ मध्ये त्यांना यूएनईपीचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सहा दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. मात्र, त्यांनी स्वतःला नेहमीच ‘जनतेचा वैज्ञानिक’ म्हणूनच ओळखले.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या डॉ. गाडगीळ यांनी आपल्या पर्यावरणविषयक संशोधनामुळे आणि कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने पर्यावरण जतन व संवर्धन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे आपण एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला मुकलो असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
गाडगीळ कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात शासन आणि समाज सहभागी असल्याचे नमूद करत, त्यांच्या चाहत्यांना तसेच संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. शेवटी, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

