दिल्लीत मराठमोळ्या संस्कृतीचा जागर
‘हुरडा पार्टी’ व ‘मकर संक्रांत महोत्सव’चे आयोजन
नवी दिल्ली : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजधानी दिल्लीत अस्सल मराठमोळ्या चवीचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव देणारा ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव रंगणार असून, दररोज दुपारी १२.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला असणार आहे, अशी माहिती निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी दिली.
या महोत्सवाच्या माध्यमातून दिल्लीतील मराठी बांधवांसह इतर नागरिकांनाही महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा आणि सण-उत्सवांचा अनुभव घेता येणार आहे. विशेषतः मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे राजधानीत मराठी संस्कृतीचा उत्साहपूर्ण आविष्कार पाहायला मिळणार आहे.


