महाराष्ट्राच्या महापालिकांवर महिलांची सत्ता; २९ पैकी १५ महापौरपदे महिलांकडे
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी तब्बल १५ महापौरपदांवर महिलांची वर्णी लागणार असून, महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात महिलांचे नेतृत्व अधिक बळकट होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड यांसारख्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांची सूत्रे आता महिलांच्या हाती येणार आहेत.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी काढण्यात आलेल्या या सोडतीत अनुसूचित जातीसाठी ३ पदे आरक्षित झाली असून त्यापैकी २ पदे अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहेत. जालना व लातूर या महापालिकांचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी ८ महापौरपदे आरक्षित झाली असून, त्यापैकी ४ पदे ओबीसी महिला प्रवर्गासाठी असतील. अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि जळगाव येथे ओबीसी महिला महापौर होणार आहेत. उर्वरित १७ महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर असतील, त्यापैकी ९ ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौरपदावरून राजकीय वाद रंगला आहे. रोस्टरप्रमाणे हे पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकडे जाणे अपेक्षित होते, असा दावा ठाकरे गटाने केला असून, सत्ताधाऱ्यांनी बहुमत लक्षात घेऊन आरक्षणाची लॉटरी काढल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. मात्र, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसारच झाल्याचे स्पष्ट करत आरोप फेटाळले.
नगरविकास विभागाच्या २००६ च्या नियमांनुसार अनुसूचित जमातीसाठी किमान तीन प्रभाग आरक्षित असणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेत अनुसूचित जमातीसाठी केवळ दोन प्रभाग आरक्षित असल्याने मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होऊ शकत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबईचे महापौरपद भाजपकडे राहण्याची शक्यता असून, भाजपमध्ये अनेक महिला इच्छुक पुढे येत आहेत. या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, अशी चर्चा आहे. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये महापौरपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


