महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू

0
35
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू

महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिलांनी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील टप्पा आहे. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे विकार, झोपेच्या समस्या तसेच नैराश्य यासारख्या अनेक अडचणींकडे आजवर मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले होते. हीच गरज ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महिलांसाठी स्वतंत्र आणि विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे मेनोपॉजच्या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधार मिळण्यास मोठी मदत होत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे देशात प्रथमच अशा स्वरूपाचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत महाराष्ट्राने घेतलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, महिलांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने गोड भेट राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली असल्याची भावना महिलांकडून व्यक्त होत आहे. संवेदनशील दृष्टिकोन, आरोग्यदृष्टी असलेले नेतृत्व आणि धाडसी निर्णयासाठी महिलांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर  :

“मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. महिलांचे आरोग्य मजबूत झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य नक्कीच सक्षम होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here