महानगरपालिकांमध्ये विशेष बैठका
नाशिक l प्रतिनिधी
नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरपालिकां -मध्ये महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. मालेगाव महानगरपालिकेसाठी ही विशेष बैठक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्देशानुसार संबंधित महापालिकांच्या सभागृहात या बैठका पार पडणार आहेत.
महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार या विशेष बैठकीस विभागीय आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
. त्यानुसार नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकेसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, धुळे महानगरपालिकेसाठी जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, अहिल्यानगरसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तर जळगाव महानगरपालिकेसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, या विशेष बैठकीचे सविस्तर इतिवृत्त महानगर पालिकेच्या अधिकृत इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर संबंधित महानगरपालिकांच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


