नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रवादीत पुढचा वारस कोण?
बारामती l प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. अजित पवार गटाचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवले जाणार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट भूमिका मांडत, स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी केली आहे.
सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे झिरवाळ यांनी स्पष्टपणे सांगितले. यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, संभाव्य नेतृत्वबदलाच्या शक्यतांना वेग आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या तोडीचा नेता सध्या त्यांच्या
गटात नाही, अशी भावना पक्षातील अनेक नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन करून पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकत्र यावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही मागणी यापूर्वीही महाराष्ट्रातील जनतेतून व्यक्त होत होती. अजित पवार यांच्या निधनानंतर ही मागणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विखुरलेपणाने पुढे जाता येणार नाही, एकत्रच राहावे लागेल, असा एकूण सूर पक्षात आणि बाहेरही दिसून येत आहे.
मात्र, या विलिनीकरणाबाबत सर्वच नेते अनुकूल आहेत असे नाही. काही नेत्यांची भूमिका अद्याप साशंक असून, शरद पवार आजवरची भूमिका बदलून भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यमान स्थिती कायम ठेवण्याकडेच शरद पवार यांचा
कल राहील, असे मत काही राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात सहभागी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्यातील नेतृत्व आणि जबाबदारी सोपवण्यात आली, तर त्यांना राज्यसभा सदस्य -त्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर विधानसभेच्या पोट निवडणुकीद्वारे त्या विधि मंडळात प्रवेश करू शकतात. त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर पार्थ पवार किंवा जय पवार यांना पाठवण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एका निर्णायक टप्प्यावर उभी राहिली असून, पुढील काही दिवसांत होणारे निर्णय पक्षाच्या भवितव्याबरोबरच राज्याच्या राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत


