राजापूरमध्ये शिवसेना व उबाठा थेट आमने-सामने
राजापूर : तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या आणि ‘मिनी मंत्रालये’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता खरी चुरस गावकुसातील प्रचारात रंगणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध उबाठा अशी थेट लढत होत असून, विकासाचे मुद्दे आणि राजकीय वर्चस्व याभोवती संपूर्ण निवडणूक फिरताना दिसत आहे.
राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी पाच गटांमध्ये शिवसेना आणि उबाठा यांच्यात सरळ दुरंगी लढत होत आहे, तर कातळी गटात तिरंगी सामना रंगला आहे. पंचायत समितीच्या बारा गणांपैकी सहा ठिकाणी दुरंगी, तर उर्वरित सहा ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती पाहायला मिळत आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर झालेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये राजापूर वगळता जिल्ह्यात महायुतीने सत्ता मिळवली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटातून प्रतीक मटकर (शिवसेना) विरुद्ध राजेश चव्हाण (उबाठा), तर तळवडे गटातून सिद्धाली मोरे (शिवसेना) विरुद्ध समिक्षा चव्हाण (उबाठा) अशी थेट लढत होत आहे. जुवाठी गटातून रमेश सूद (शिवसेना) विरुद्ध दिनेश जैतापकर (उबाठा), धोपेश्वर गटातून प्रकाश कुवळेकर (शिवसेना) विरुद्ध अभिजीत तेली (उबाठा), तर साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना) विरुद्ध नलिनी शेलार (उबाठा) यांच्यात चुरशीची दुरंगी लढत होत आहे.
कातळी गटात मात्र शिवसेनेच्या सोनाली ठुकरूल, उबाठाच्या लक्ष्मी शिवलकर आणि अपक्ष सावित्री कणेरी यांच्यात तिरंगी लढत होत असून, या गटाकडे विशेष लक्ष लागले आहे. एकूणच राजापूर तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार , आहे.


