रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेश

0
69
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेश
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेश

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेश

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमता वाढीसाठी तंत्रज्ञानसज्ज पायाभूत सुविधांचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, मा. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बस प्राप्त झाल्या आहेत. या बसमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या कामकाजात मोठी मदत होणार आहे.

या अत्याधुनिक सर्व्हिलन्स बसच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलने, सार्वजनिक कार्यक्रम तसेच विविध संवेदनशील प्रसंगी प्रभावी निरीक्षण, नियंत्रण व समन्वय ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. पोलीस दलाच्या गरजांनुसार आवश्यक ते बदल करून या बस विशेषरित्या सुसज्ज करण्यात आल्या आहेत.

सदर बसच्या चारही बाजूंना CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे परिसरावर सर्वांगीण आणि सातत्यपूर्ण नजर ठेवणे शक्य होणार आहे. तसेच बसच्या आतील भागातून छतावर जाण्यासाठी शिडीची सोय करण्यात आली असून, छतावर सहज उघडता येतील अशा फोल्डेबल रेलिंग बसविण्यात आल्या आहेत. यामुळे काही क्षणांतच सुरक्षित निरीक्षण मंच (प्लॅटफॉर्म) उभारता येणार आहे.

याशिवाय, निरीक्षण मंचावर उभे राहून काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सुरक्षिततेसाठी तसेच प्रतिकूल हवामानातही कामकाज सुरू ठेवता यावे यासाठी छत्री बसविण्यासाठी स्वतंत्र व नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, मा. पोलीस उपाधीक्षक श्रीमती राधिका फडके, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

या आधुनिक वाहनांच्या समावेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि तंत्रज्ञानसक्षम होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे

या सुविधांमुळे बंदोबस्तादरम्यान परिस्थितीचे प्रभावी निरीक्षण व नियंत्रण राखणे अधिक सोपे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here