Kokan: कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम

0
315
कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम
कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम

दापोली– मुख्यमंत्री ‘माझी स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कर्दे या शाळेने दापोली तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून या शाळेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यसभेच्या-४१-जागा-बि/

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच आयोजित केलेल्या मुख्यमंत्री ‘माझी स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत सर्व शाळांचे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन करण्यात आले होते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करतानाच दापोली तालुक्यातील कर्दे शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कर्दे गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर अतिशय चमकदार कामगिरी करीत आहे. शालेय इमारत व परिसर सजावट, आकर्षक व बोलकी इमारत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रज्ञाशोध स्पर्धांमध्ये शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

याशिवाय पर्यावरण शिक्षण, आरोग्य, परिसर अभ्यास यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांत या शाळेने सक्रिय सहभाग घेतला आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून या शाळेची दापोली तालुक्यातील प्रथम क्रमांकाची स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून निवड झाली असून आता या शाळेचे जिल्हास्तरावर मूल्यमापन होणार आहे. सध्या शाळेत विद्यादानाचे व अध्यापनाचे कार्य करीत असलेले शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार मळगे, स्वप्नील परकाळे, सुशांत केळसकर, वैजन देवघरकर हे चारही शिक्षक शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी अविरत प्रयत्नशील असून या सर्वांच्या कामगिरीचेही पालकांनी नेहमीच कौतुक केले आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासात येथील पालकांचा सहभागही महत्त्वपूर्ण असून येथील सर्व पालक शाळेस चांगले सहकार्य करीत असून आवश्यक योगदान देत आहेत.

या सर्व बाबींचा प्रभाव म्हणून मुख्यमंत्री ‘माझी स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत कर्दे शाळेने दापोली तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील कर्दे शाळेने अभिमानास्पद यश संपादन केल्याबद्दल कर्दे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके, उपाध्यक्ष सुशील मळेकर, कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, ग्रामसेवक गोरख पवार, स्थानिक प्राधिकरण सदस्य अपर्णा रुके, शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र माने, आसूद केंद्राचे केंद्रप्रमुख गुलाबराव गावीत, दापोली शिक्षण प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, गटविकास अधिकारी सुनील खरात आदी अनेक मान्यवरांनी कर्दे शाळेचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here