
होळी उत्सवासाठी २५ फेब्रुवारीपासून विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू
मुंबई : होळी उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन Konkan Railway प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ सालच्या होळी सणानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव तसेच चिपळूण–दिवा मार्गावर विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण २५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन ते Lokmanya Tilak Terminus विशेष गाडी १ मार्च (रविवार) आणि ८ मार्च (रविवार) रोजी सायं. ४.३० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस–Madgaon विशेष गाडी २ मार्च (सोमवार) आणि ९ मार्च (सोमवार) रोजी सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
या विशेष गाड्या करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाडीमध्ये एकूण २० डबे असतील, त्यात १८ स्लीपर आणि २ एसएलआर/डी डबे असतील.
याशिवाय ट्रेन क्रमांक ०११६०/०११५९ Chiplun–Diva मेमु अनारक्षित विशेष गाडी १ मार्च ते ८ मार्च दरम्यान दररोज धावणार आहे. चिपळूण–दिवा गाडी दुपारी ३.३० वाजता सुटून रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल. तर दिवा–चिपळूण गाडी रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. या मेमु गाडीमध्ये एकूण ८ डबे असतील.
ट्रेन क्रमांक ०१००४ चे आरक्षण २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवाशांनी वेळेवर आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि मुंबईदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी हालचाल अपेक्षित असल्याने या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

