आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईचा इशारा – विजय वडेट्टीवार.

0
36
आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईचा इशारा - विजय वडेट्टीवार.
आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईचा इशारा - विजय वडेट्टीवार.

आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईचा इशारा – विजय वडेट्टीवार.

मुंबई l प्रतिनिधी

‘आयुष्मान भारत’ तसेच ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत पात्र रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार. यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत या योजनांचा लाभ प्रत्यक्षात रुग्णांना मिळत नाही. अनेक खासगी रुग्णालयांकडून योजनेंतर्गत उपचारा -साठी येणाऱ्या रुग्णांना नकार दिला जात आहे. काही ठिकाणी रुग्णांकडून थेट पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. सरकारने योजना जाहीर केल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गरिबांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारही केल्याचे सांगितले.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची दखल घेत रुग्णालयांकडून टाळाटाळ होत असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. राज्यातील एकूण ४७९ नोंदणीकृत रुग्णालयांपैकी केवळ १३४ रुग्णालये सध्या एकत्रितपणे या दोन्ही योजना प्रभावीपणे राबवत आहेत. उर्वरित रुग्णालयांनी विविध कारणे देत प्रक्रियेला विरोध केला असून काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नसतानाही काही रुग्णालयांनी सहकार्य केले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ख्यमंत्री म्हणाले की, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायद्यात आवश्यक ते बदल केले असून सर्व संबंधित रुग्णालयांना या योजना राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे पात्र रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या किंवा योजनांची अंमलबजावणी टाळणाऱ्या रुग्णालयांवर कायद्यानुसार सुनावणी घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. गरिब आणि गरजू रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ नाकारला जाणार नाही, याची खात्री सरकार करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने अधिक काटेकोर पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरजू रुग्णांना वेळेवर आणि विनामूल्य उपचार मिळावेत, यासाठी सरकारने स्पष्ट आणि कडक भूमिका घेतल्याचे संकेत या चर्चेतून मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here