रत्नागिरीत २७ फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा
रत्नागिरी,l प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मिरजोळे औद्योगिक वसाहत येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नोलॉजी येथे होणार आहे.
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम संकेतस्थळाच्या माध्यमातून या मेळाव्यात सहभागी व्हावे व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/ उद्योजकांनी आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करण्यात यावी व जिल्हयातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करुन द्यावीत. तसेच दिलेल्या वापरकर्ता क्रमांक व संकेतशब्दाचा उपयोग करून रिक्त पदे नोंदवावीत.
रोजगार मेळाव्याद्वारे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे प्र. सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी कळविले आहे.
मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, तांत्रिक शिक्षण घेतलेले तसेच विविध कौशल्याधारित प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी आपला जीवनवृत्त, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती तसेच आवश्यक प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे


