डोंबिवलीत बनावट ‘Telma AM’ गोळ्यांवर कारवाई
डोंबिवली l प्रतिनिधी
शहर परिसरात बनावट रक्तदाबाच्या औषधांची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,डोंबिवली भागात Telma AM’ या रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या नावाखाली बनावट टॅब्लेट्स विक्री केल्या जात होत्या. या औषधांच्या पॅकेजिंगची नक्कल करून बाजारात वितरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहिती नंतर पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात
बनावट गोळ्या, पॅकिंग साहित्य आणि वितरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. जप्त साठ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रक्तदाबासारख्या गंभीर आजारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बनावट आवृत्ती बाजारात आल्याने रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा बनावट औषधांमुळे अपेक्षित परिणाम न मिळाल्यास रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता असते.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध औषध व सौंदर्यप्रसाधने अधिनियम तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांचा पुरवठा साखळी किती मोठी आहे, तसेच इतर कोठे वितरण झाले आहे का, याचा तपास प्रशासन करत आहे.
दरम्यान, नागरिकांनी औषधे खरेदी करताना अधिकृत मेडिकल दुकानातूनच खरेदी करावी, पॅकेजिंगवरील बॅच क्रमांक, उत्पादन व कालबाह्यता तारीख तपासावी, तसेच संशयास्पद औषधांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे


