लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर बोधचिन्हांचा ‘सुळसुळाट’; टोल माफीवर प्रश्नचिन्ह
बीड l प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर शासकीय बोधचिन्ह (लोगो) मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध मार्गांवर प्रवास करताना अशा बोधचिन्ह असलेल्या अनेक गाड्या आढळून येत असल्याने या चिन्हांचा वापर नेमका कोणत्या नियमांनुसार केला जातो, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. अलीकडे बीड जिल्ह्यात विविध मार्गांवर प्रवास करताना अशा बोधचिन्ह असलेल्या तीस ते चाळीस गाड्या दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गाड्यांचे क्रमांक वेगवेगळे असून काही गाड्यांवर एमएच-२३ आणि एमएच-४४ मालिका क्रमांक असल्याचेही निदर्शनास आले आहे.
सामान्यतः लोकप्रतिनिधींच्या अधिकृत वाहनांवरच शासकीय बोधचिन्ह लावले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक वाहनांवर असे चिन्ह दिसून येत असल्याची चर्चा होत आहे. एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित इतर वाहनांवरही हे चिन्ह वापरले जात आहे का, असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या मते, एका लोकप्रतिनिधीला प्रवासासाठी एका वेळेस एकच वाहन आवश्यक असते. मग अनेक गाड्यांवर शासकीय बोधचिन्ह लावण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासोबतच टोल नाक्यांवरील सवलतींबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. बोधचिन्ह असलेल्या प्रत्येक वाहनाला टोल माफी लागू होते का, की केवळ अधिकृत वाहनालाच ही सुविधा असते, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. जर या चिन्हांच्या आधारे अनेक वाहने टोल नाक्यांवरून शुल्क न देता जात असतील, तर त्याचा आर्थिक भार शेवटी सामान्य नागरिकांवरच पडत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
कायदा आणि नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यामुळे कर आणि सवलतींच्या बाबतीतही समान नियम लागू व्हावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


