पुणे जिल्हा परिषद व आयआयएसईआरच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
पुणे : पुणे जिल्हा परिषद प्रशासन आणि Indian Institute of Science Education and Research Pune यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदांच्या ५० शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक विज्ञान उपक्रमांमध्ये सहभाग घेत शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते Arvind Gupta यांचे “लिटील टॉईज – बिग सायन्स” हे सत्र विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. या सत्रातून साध्या वस्तूंमधून विज्ञानाचे प्रयोग कसे करता येतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
३५० सहभागी शाळांमधून जिल्हा परिषदांच्या दोन शाळांची अंतिम एसटीईएम प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. यामध्ये जि.प. शाळा कोरेगाव बु. यांनी “सायन्स अँड गेमिफिकेशन” हा प्रकल्प सादर केला, तर जि.प. शाळा बोतरवाडी यांनी “हवेचे प्रदूषण कसे कमी करावे” हा उपक्रम मांडला.
दरम्यान, आयआयएसईआर पुणे येथे “वुमन इन सायन्स : कॅटालायझिंग विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विज्ञान विषयातील जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची सखोल समज निर्माण होऊन भविष्यात संशोधन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


