बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ‘कर्तव्यनिष्ठा’ व ‘कार्यगौरव’ पुरस्कार जाहीर

0
27
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ‘कर्तव्यनिष्ठा’ व ‘कार्यगौरव’ पुरस्कार जाहीर
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ‘कर्तव्यनिष्ठा’ व ‘कार्यगौरव’ पुरस्कार जाहीर

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ‘कर्तव्यनिष्ठा’ व ‘कार्यगौरव’ पुरस्कार जाहीर

आचरा (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेली १४ वर्षे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अप्रकाशित पण समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ट्रस्टने सन २०२५-२६ साठीचे कर्तव्यनिष्ठा पुरस्कारकार्यगौरव पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ अशा एकूण ५ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच महिला एनसीसी अधिकाऱ्याचा या पुरस्कारासाठी सन्मान करण्यात येणार आहे.

रत्नागिरी येथील महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटमध्ये तब्बल १८ वर्षे एनसीसी ए.एन.ओ. म्हणून कार्य करत मेजर पदापर्यंत मजल मारलेल्या तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांना यंदाचा कर्तव्यनिष्ठा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक असे आहे.

यंदाच्या कार्यगौरव पुरस्कारासाठी दाभोळ-गुजर आळी (ता. दापोली) येथील किराणा व्यापारी असूनही गेली ५० वर्षे वाचनसंस्कृती जपण्यासाठी स्वखर्चाने शेकडो पुस्तके खरेदी करून खाजगी संदर्भ ग्रंथालय उभारणारे प्रविण पर्शुराम गुजर, देवरुख येथील अमेय अशोक लिमये, राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील सदानंद तानाजी झिंबरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील सुलोचना अंकुश जाधव (गावकार) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारात सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० रोख रक्कम देण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त पाच जणांपैकी रत्नागिरीबाहेरील चार सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक, शाल व रोख रक्कम त्यांच्या कार्यस्थळी स्पीड पोस्ट आणि बँक हस्तांतरणाद्वारे पाठविण्यात येणार आहे. तर मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांचा गौरव शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार अॅडव्होकेट आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here