नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री ऑल इंडिया रँक १
नवी दिल्ली : Union Public Service Commission (यूपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी या परीक्षेत यंदा एकूण ९५८ उमेदवारांची आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सेवांसाठी निवड करण्यात आली आहे.
या परीक्षेची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखतीची प्रक्रिया फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालू होती. लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत यंदा अनुज अग्निहोत्री यांनी ऑल इंडिया रँक १ (AIR 1) मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यादीत राजेश्वरी सुवे यांनी दुसरा क्रमांक मिळवला असून आकांक्षा ढुल यांनी तिसरा क्रमांक मिळवत अव्वल तिन्हीमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच टॉप २० मध्ये इशान भटनागर, जिनिया अरोडा आणि आस्था जैन यांसारख्या उमेदवारांचाही समावेश आहे.
नागरी सेवा परीक्षेद्वारे निवड झालेल्या ९५८ उमेदवारांना आता प्रशिक्षणानंतर भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अशा विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्ती मिळणार असून ते देशाच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.


