पीएमआरडीएच्या आयुक्तपदावरून योगेश म्हसे यांची बदली
पुणे : राज्य शासनाने प्रशासकीय फेरबदल करत Yogesh Mhase यांची Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए) च्या महानगर आयुक्तपदावरून बदली केली आहे. त्यांच्या जागी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त Abhijeet Chaudhari यांची पीएमआरडीएच्या नव्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हसे यांची मुंबईतील अल्पसंख्याक विकास विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अधिकृत आदेशातून देण्यात आली.
२००९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले योगेश म्हसे यांनी जून २०२४ मध्ये पीएमआरडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात पुणे महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच मेट्रो प्रकल्पाशी संबंधित समन्वय, रस्ते रुंदीकरण, नवीन रस्त्यांचे टेंडर आणि टाउन प्लॅनिंग योजनांवरही त्यांनी काम केले होते.
दरम्यान, पुण्यात वाढत चाललेल्या धूळ आणि वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांकडून प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, रस्ते कामे आणि वाहतूक यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनात झालेला हा बदल महत्त्वाचा मानला जात असून, नव्या आयुक्तांकडून धूळमुक्त व प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


