एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; मुलींनी लस घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : एचपीव्ही लसीकरणाबाबत समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी ९ ते १४ वर्ष वयोगटातील दहा हजारांहून अधिक मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत, अशी माहिती श्रीमती रानडे यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, सध्या समाजमाध्यमांवर एचपीव्ही लसीकरणाबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि संदेश प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवावा. १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींनी ही लस घेणे अत्यंत आवश्यक असून पालकांनीही आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एचपीव्ही हा महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. एचपीव्ही लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळते. ही लस शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत मोफत उपलब्ध असून पात्र मुलींनी लसीकरण करून आपल्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे तसेच कोकणनगर नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे, डॉ. अझर शेख, डॉ. नूतन सातघरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सहाय्यक चेतन शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. नूतन सातघरे यांनी आभार प्रदर्शन केले.
दरम्यान, एचपीव्ही लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच शाळांमध्ये आयोजित विशेष लसीकरण सत्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


