आरोग्य सेविकेवरील हल्ल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
रत्नागिरी l प्रतिनिधी
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून संबंधित आरोपीला तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून या प्रकरणात तातडीने न्याय मिळाला नाही तर आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलन करण्यास बाध्य होतील.
या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


