फाटलेले ओठ व टाळू रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
वैभववाडी l प्रतिनिधी
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि ऑपरेशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराअंतर्गत निवड झालेल्या रुग्णांवर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियेपूर्व तपासणी शिबिर मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. जन्मतः फाटलेले ओठ व टाळू असलेल्या सहा महिन्यांवरील सर्व वयोगटातील रुग्णांची या शिबिरात तपासणी केली जाणार आहे.
तपासणीनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना १३ ते २० मार्च २०२६ या कालावधीत बेळगाव येथील केएलई रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. रुग्णांसोबत एक ते दोन नातेवाईकांसाठी मोफत प्रवास, निवास आणि भोजनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या शिबिराबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी ९४०४७४०४९०, ९४२१२३५५८६, ९६७३३६५९८८, ९४०३६३६४५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच शिल्पा खोत, हिराचंद तानावडे, राजेश पडवळ आणि मकरंद सावंत यांच्याशीही संपर्क साधता येईल, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


