महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत

0
71
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होणार – ॲड.आशिष शेलार, मंत्री, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान

मुंबई l प्रतिनिधी

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक १० ते १४ मार्च, २०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे रंगत असून राज्यातील विविध १७ महाविद्यालयांतील विद्यार्थी कलाकार त्यात सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड वाढविणे, नवोदित लेखक, दिग्दर्शक व कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेला डॉ. किरण कुलकर्णी, मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली असून विविध १७ महाविद्यालयांचे संघ आपापल्या एकांकिका सादर करत आहेत. या निमित्ताने प्रेक्षकांना दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण एकांकिका पाहण्याची संधी मिळाणार आहे. एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ८३ एकांकिका सादर झाल्या होत्या.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळणार असून मराठी रंगभूमीला नव्या पिढीतील कलाकार घडण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या सर्व एकांकिका रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. या एकांकिकांच्या प्रवेशिका नाट्यगृहावर विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

अंतिम फेरीतील एकांकिका पाहण्यासाठी इच्छुक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई संचालक श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.

या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रंगभूमीवरील आपली कला सादर करण्याची महत्त्वाची संधी मिळत आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि रंगमंच व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता या माध्यमातून समोर येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही मानले जाते. त्यामुळे ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता एक सांस्कृतिक चळवळ बनत आहे.

यंदाच्या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतील महाविद्यालयांनी सहभाग घेतल्यामुळे विषय आणि सादरीकरणात मोठे वैविध्य पाहायला मिळत आहे. सामाजिक प्रश्न, तरुणांच्या भावना, बदलते जीवनमान आणि आधुनिक विचार यावर आधारित एकांकिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेमुळे प्रत्येक एकांकिका वेगळी आणि विचार करायला लावणारी ठरत आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांकडूनही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी रंगभूमीला नवी उर्जा देण्याचे काम अशा स्पर्धांमधून होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here