मैदानात भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका -माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

0
68
मैदानात भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका -माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर
मैदानात भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका -माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

मैदानात भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका -माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

फोटो ओळी –  पनवेल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या डिव्हाईन क्रिकेट अकादमी संघाचे छायाचित्र. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एच.डी.एफ.सी.बँकेचे वरिष्ठ सेल्स मॅनेजर बलकार सिंग आणि अदिती चौधरी, अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव आणि प्रशिक्षक  गायतोंडे दिसत आहेत.

मुंबई l विजय बने

“मैदानावर खेळत असताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका” असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी पनवेल येथे झालेल्या एच.डी.एफ.सी.बँक परिवर्तन कप या १४ वर्षाखालील मुलांच्या पारितोषिक वितरण समारंभात दिला. दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या पनवेल येथील अकादमीच्या मैदानावर अंतिम सामन्यानंतर झालेल्या समारंभात ते पुढे म्हणाले ” मला ठाऊक आहे तुम्ही टेली व्हिजन वर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने बघता, मात्र ते बघत असताना त्या संघातील खेळाडू झेल टिपला अथवा बळी मिळविल्यानंतर कसे आक्रमक हावभाव करत नाचतात अशा गोष्टी आत्मसात न करता केवळ त्यांच्या चांगल्या गोष्टी – उदाहरणार्थ ते खेळाडू सामने जिंकण्यासाठी कशी मेहनत घेतात, त्यांची खेळण्याची कार्यपद्धती, खेळाप्रती असलेली निष्ठा अशा गोष्टी तुम्ही बघून त्या आत्मसात करायला हव्यात असे ते पुढे म्हणाले. दरम्यान अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात डिव्हाईन क्रिकेट अकादमी संघाने स्पोर्ट्स फील्ड संघावर केवळ १० धावांनी विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पोर्ट्स फील्ड संघाने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी डिव्हाईन क्रिकेट अकॅडमि संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. काही अंशी त्यांचा हा निर्णय योग्यच ठरला, कारण डावखुरा फिरकी गोलंदाज लकी साकारिया याने १६ धावांत ४ बळी तर रांचो तेरवे (२०/२),ओम लोखंडे (२६/२) आणि स्वरूप मोरे (१८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून ४० षटकांच्या या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला ३१.१ षटकांतच १०२ धावांत गुंडाळण्याची किमया केली. माधव ठाकरे (३३) आणि योहान बारुआ (२१)

यांनी ५१ धावांची सलामी दिली तर विवान गुर्जर याने आणखी १६ धावांची भर टाकली. मात्र त्यानंतर अन्य आठ फलंदाजांना दोन आकडी धावा देखील करता आल्या नाहीत. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पोर्ट्स फील्ड संघाच्या सलामीवीर रियाण तेरवे (८ चौकारांसह ४९ धावा) याने एकाकी झुंज दिली; पण अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. हृदान पाटील (९ धावांत ३ बळी) आणि माधव ठाकरे (८ धावांत ३ बळी) या माध्यम गती गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत त्यांच्या अन्य फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही आणि अत्यंत चुरशीच्या या लढतीत १० धावांनी सनसनाटी विजय मिळविला. डिव्हाईन क्रिकेट अकादमी संघातील खेळाडूंनी कमी धावांत बाद झाल्यानंतर देखील उत्तम क्षेत्ररक्षण करून प्रतिस्पर्ध्यांवर कायम दडपण राखले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून डिव्हाईन क्रिकेट अकादमीच्या माधव ठाकरे (१११ धावा आणि ४ बळी) याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून लकी साकारिया (११ बळी), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आकाश कौशिक (८ झेल) आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रियाण तेरवे (233 धावा आणि 5 बळी) (सगळे स्पोर्ट्स फील्ड) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, तसेच एच.डी.एफ.सी.बँकेचे वरिष्ठ सेल्स मॅनेजर बलकार सिंग आणि अदिती चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : डिव्हाईन क्रिकेट अकादमी – ३१.१ षटकांत सर्वबाद १०२ (योहान बारुआ २१, माधव ठाकरे ३३, विवान गुर्जर १६; लकी साकारिया १६ धावांत ४ बळी, रांचो तेरवे २० धावांत २ बळी, ओम लोखंडे २६ धावांत २ बळी, स्वरूप मोरे १८ धावांत २ बळी) वि.वि. स्पोर्ट्स फील्ड – ३६.५ षटकांत सर्वबाद ९२ (रियाण तेरवे ४९; हृदान पाटील ९ धावांत ३ बळी, माधव ठाकरे ८ धावांत ३ बळी) सामनावीर- माधव ठाकरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here