राहुरी कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवी
राहुरी l प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या समारंभाला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कृषी मंत्री व विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
समारंभा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना प्रदान करण्यात आली.
या पदवीप्रदान सोहळ्यात राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते विविध विद्याशाखांतील एकूण ४ हजार ६०२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ४ हजार १८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर ७४ विद्यार्थ्यांना आचार्य (पीएच.डी.) पदवी देण्यात आली.
तसेच शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या ४२ यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके व रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या यशाचे आणि त्यांच्या भावी कारकिर्दीच्या वाटचालीचे कौतुक करण्यात आले.


