बुलेट ट्रेनपेक्षा कोकण रेल्वेचे दुपदरीकरण महत्त्वाचे; संसदेत अरविंद सावंतांचा सरकारला घेराव
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील सिंगल ट्रॅकमुळे गाड्यांना तब्बल सात-सात तास विलंब होत असून त्याचा सर्वाधिक फटका कोकणातील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तातडीने विलीनीकरण करावे आणि संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण हाती घ्यावे, अशी ठाम मागणी माजी केंद्रीय मंत्री, मुंबईचे खासदार तथा सिंधुदुर्गचे सुपुत्र अरविंद सावंत यांनी सोमवारी संसदेत केली. रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना सावंत यांनी कोकण रेल्वेबरोबरच मुंबई लोकलच्या रखडलेल्या प्रश्नांवरही सरकारला धारेवर धरले.
संसदेत बोलताना खा. सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र सिंगल ट्रॅकमुळे या मार्गावरील गाड्या वारंवार उशिरा धावतात. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, हा प्रश्न आता दुर्लक्षित करून चालणार नाही. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना ४० किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण झाले; मात्र त्यानंतर काम ठप्प पडले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. मधु दंडवते यांनी रेल्वेमंत्री असताना या मार्गाचे स्वप्न साकार केले, परंतु आज वाढती रेल्वे वाहतूक लक्षात घेता या मार्गाचे संपूर्ण दुपदरीकरण अपरिहार्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी सभागृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. सावंत यांच्या मागणीला उत्तर देताना वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. कोकण रेल्वे प्रकल्प उभारताना पाच राज्यांचा सहभाग होता. त्यापैकी दोन राज्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास मान्यता दिली असून उर्वरित तीन राज्यांचीही संमती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अरविंद सावंत यांनी याचवेळी मुंबई लोकल सेवेचा प्रश्नही संसदेत जोरदारपणे मांडला. सरकारकडून बुलेट ट्रेन, हायस्पीड कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची चर्चा होत असली, तरी सामान्य प्रवाशांच्या पदरात नेमके काय पडते? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली. जोपर्यंत चार मार्गांचे सहा मार्गांमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत मुंबई लोकल सेवेवरील ताण कमी होणार नाही, असे ते म्हणाले.
तसेच सुरेश प्रभू यांनी सुचविलेल्या एलिव्हेटेड ट्रेन प्रकल्पावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. एकीकडे बुलेट ट्रेनचे स्वप्न रंगवले जात असताना दुसरीकडे कोकण रेल्वेवरील विलंब, लोकलमधील गर्दी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
सावंत यांनी पालघरमधील सफाळे येथे बुलेट ट्रेनच्या बोगद्याच्या कामासाठी होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना भेगा पडत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्यामुळे विकासकामांच्या नावाखाली स्थानिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला.
एकंदरीत, संसदेत अरविंद सावंत यांनी मांडलेली भूमिका स्पष्ट होती — आज कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि भारतीय रेल्वेत विलीनीकरण हीच खरी गरज आहे; बुलेट ट्रेनपेक्षा सामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे.


