
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट ड्रीम’ लोगोचे अनावरण
जिल्हा परिषद नागपूरचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
नागपूर l प्रतिनिधी
जिल्हा परिषद नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विविध विकासाभिमुख उपक्रमांची माहितीही मान्यवरांसमोर सादर करण्यात आली.या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘प्रोजेक्ट ड्रीम’ हा जिल्हा परिषद नागपूरच्या माध्यमातून राबविण्यात येणारा बहुआयामी उपक्रम असून, ग्रामीण भागातील शैक्षणिक, तांत्रिक, पोषण आणि बालविकासाच्या सुविधा अधिक सक्षम करण्याचा त्यामागीलउद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत १०० व्हिलेज लायब्ररी, १४ आयसीटी लॅब, ‘दीदी की रसोई’, सुपर ४० अंगणवाडी आणि ४८ गुरुकुल अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न वातावरण, डिजिटल शिक्षण, पोषणविषयक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘प्रोजेक्ट ड्रीम’मुळे जिल्हा परिषद नागपूरच्या विकासात्मक उपक्रमांना नवे बळ मिळणार असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे ‘प्रोजेक्ट ड्रीम’ हा उपक्रम केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरता मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील शिक्षण, पोषण, डिजिटल सक्षमीकरण आणि बालविकासाला चालना देणारा सर्वसमावेशक विकास आराखडा म्हणून पुढे येत आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या या उपक्रमाकडून ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

