कणकवलीत एका रात्रीत सहा दुकाने फोडली; पोलिस ठाण्यापासून अवघ्या १५० मीटरवर धाडसी चोरी
कणकवली, प्रतिनिधी (छाया र. ठाकूर):
कणकवली शहरातील भरवस्तीत असलेल्या पटवर्धन चौक परिसरात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही चोरीची घटना कणकवली पोलीस ठाण्यापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारात सुमारे २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.
याप्रकरणी स्मिता नुपूर सामंत (वय ३२, रा. कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील ‘एस.पी. बोअरवेल अॅण्ड इलेक्ट्रिकल’ या दुकानाचे लोखंडी शटर तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. येथून सुमारे १२ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल हॅण्डसेट चोरीस गेला. याच कॉम्प्लेक्समधील कासम इस्माईल शेख व आनंद अनिल ठाकूर यांच्या दुकानांनाही चोरट्याने लक्ष्य केले.
तसेच सना कॉम्प्लेक्ससमोरील ‘राज जनआरोग्य जेनरिक मेडिकल’चे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय गुरुप्रसाद कॉम्प्लेक्समधील ‘कोरगांवकर ट्रेडर्स’मधून १० हजार रुपये तर ‘हॉटेल कोकण हाउस’मधून ३ हजार १०० रुपये चोरट्याने लंपास केले. ही घटना ३ एप्रिलच्या रात्री ते ४ एप्रिलच्या पहाटे दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता पहाटेच्या सुमारास एक संशयित इसम परिसरात फिरताना दिसून आला आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वेळ प्रत्यक्ष वेळेपेक्षा काहीशी पुढे असल्याचेही निदर्शनास आले आहे.
एकाच रात्रीत सहा दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही सोन्याचे दुकान फोडल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक वृषाली बर्गे तसेच हवालदार गुनिजन व पांडुरंग पांढरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, सना कॉम्प्लेक्स परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून रात्रीच्या गस्तीबाबत पोलिसांनी अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.


