रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात

0
59
नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी; सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांचे अंतर बंधनकारक
नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी; सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांचे अंतर बंधनकारक

रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक लहान हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून काहींनी पर्याय म्हणून चुलीचा आधार घेतला आहे, तर मोठ्या हॉटेल्सना हा पर्याय शक्य नसल्याने काहींनी थेट हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री Uday Samant यांनी तातडीने जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. गॅस तुटवड्यावर तत्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ज्या हॉटेल व्यावसायिकांना शक्य आहे त्यांना ‘महानगर गॅस’ पाईपलाईन जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नगरपालिका प्रशासन आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून नोंदणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, गॅस सिलिंडरच्या वितरणात समन्वय राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ज्या लहान हॉटेल व्यावसायिकांना एक सिलिंडर १५ ते २० दिवस पुरतो, त्यांना प्राधान्याने पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here