मुंबई- राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. मात्र, नाशिक व ठाणे या दोन जागांच्या वाटपावरून अद्यापही रस्सीखेच कायम असल्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला मिळणार की भाजप लढवणार ? राष्ट्रवादीची मागणी पूर्ण होणार की, तिघांच्या भांडणात मनसेची ‘लॉटरी’ लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकची उमेदवारी भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-नारायण-राणे-यांच्यामध्य/
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)त गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. विशेषत: एकाच जागेसाठी तीनही घटक पक्षांनी दावा केल्यामुळे महायुतीत अनेक वेळा तणाव असल्याचे दिसून आले. त्यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप करत ‘अबकी बार ४०० पार’ करिता एकसंध राहणे गरजेचे असल्याचे घटक पक्षांना पटवून दिले. त्यातून सोमवार (दि.२५)अखेर राज्यातील ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत झाल्याची चर्चा आहे. मात्र, नाशिक व ठाण्याच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष अद्यापही कायम राहिला आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. कारण ठाण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची असल्याने शिंदे सेना ही जागा सोडण्यास तयार नाही.
नाशिकची जागाही शिंदे सेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी गोडसे यांच्या समर्थनार्थ शिंदे सेनेने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केल्यानंतर सोमवारी भाजपच्या आम . प्रा. देवयानी फरांदे, आम . सीमा हिरे, आम . ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, दिनकर पाटील, केदा आहेर, गणेश गिते आदींनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत नाशिकची जागा भाजपलाच मिळायला हवी, असा आग्रह धरला. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदे सेनेची ताकद कमी असल्यामुळे ही जागा भाजपच जिंकू शकते, असे फडणवीस यांना पटवून देण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांनी केला.