असलदे गावाचा ऐतिहासिक निर्णय : परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी

0
90
असलदे गावाचा ऐतिहासिक निर्णय : परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी
असलदे गावाचा ऐतिहासिक निर्णय : परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी

असलदे गावाचा ऐतिहासिक निर्णय : परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी

महत्त्वपूर्ण ठराव :
ग्रामसभेत जमीन विक्रीबाबत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. यापुढील काळात जमिनी विकताना सर्वप्रथम भावकीला, त्यानंतर वाडीतील शेजाऱ्याला आणि त्यानंतर गावातील इतर व्यक्तींना प्राधान्य देऊनच विक्री करावी, असे ठरवण्यात आले. तसेच पर्यावरण रक्षणाबरोबरच सण, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावाच्या निर्णयानंतर असलदे गावाने घेतलेला हा निर्णय केवळ जमीन व्यवहारांपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांचे जतन आणि सांस्कृतिक ओळख टिकवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात कोकणातील इतर गावांनाही अशाच प्रकारचे निर्णय घेण्यास प्रेरणा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावाने पर्यावरण, स्थानिक हक्क आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावातील ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करून परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावाने घेतलेल्या निर्णयानंतर असलदे गावानेही हा ठाम पवित्रा घेतल्याने संपूर्ण कोकणात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

असलदे गावठणवाडी येथील श्री देव रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या बैठकीला सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, माजी सरपंच सुरेश लोके, उद्योजक सुरेश डामरे, पत्रकार नरेंद्र हडकर यांच्यासह गावातील अनेक मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, सुपीक जमीन आणि पर्यावरणपूरक वातावरणामुळे बाहेरील राज्यांतील गुंतवणूकदार, कंपन्या आणि उद्योजक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करत आहेत. यामुळे भविष्यात स्थानिक भूमिपुत्र विस्थापित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच, मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री झाल्यास गावातील जैवविविधता, जंगलसंपदा आणि पारंपरिक शेतीव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर ग्रामसभेत सखोल चर्चा करण्यात आली. गावातील एकोपा, सण-उत्सवांची परंपरा आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here