महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; अकोला ४४°C सह जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अव्वल

0
143
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; अकोला ४४°C सह जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अव्वल
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; अकोला ४४°C सह जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अव्वल

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; अकोला ४४°C सह जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अव्वल

अकोला (प्रतिनिधी): राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अकोला येथे मंगळवारी तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अकोला हे जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे.

हवामानविषयक आकडेवारीनुसार, अकोला आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथे ४४.०°C तापमान नोंदले गेले, ज्यामुळे ही दोन्ही शहरे जागतिक स्तरावर सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अव्वल ठरली. त्यानंतर अमरावती येथे ४३.८°C तापमान नोंदले गेले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे.

याशिवाय वर्धा (४३.५°C), आदिलाबाद (४३.३°C), सोलापूर (४३.२°C) आणि अनंतपूर (४३.१°C) या शहरांनीही जगातील उष्ण शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

जगातील पहिल्या १५ उष्ण शहरांपैकी जवळपास निम्मी म्हणजेच सात शहरे भारतातील असून, त्यापैकी चार शहरे महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे, यातील तीन शहरे विदर्भातील आहेत, ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

नागपूर येथेही उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून ४२.२°C कमाल आणि २२.८°C किमान तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्यामुळे रात्रीही उकाडा जाणवत आहे.

याशिवाय बुलढाणा (४१.६°C), ब्रह्मपुरी (४२.०°C), चंद्रपूर (४२.२°C), गडचिरोली (४२.६°C), गोंदिया (४१.१°C), वाशीम (४२.४°C) आणि यवतमाळ (४२.६°C) येथेही तापमान ४० अंशांवर गेले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here