वैष्णवी–चंद्रकांतचा अनोखा लग्नसोहळा; भारतीय नृत्यशैलीतून कलात्मक विवाह बंधनातं पडले कलाकार जोडपे.

0
14
वैष्णवी–चंद्रकांतचा अनोखा लग्नसोहळा; भारतीय नृत्यशैलीतून कलात्मक विवाह बंधनातं पडले कलाकार जोडपे.
वैष्णवी–चंद्रकांतचा अनोखा लग्नसोहळा; भारतीय नृत्यशैलीतून कलात्मक विवाह बंधनातं पडले कलाकार जोडपे.

वैष्णवी–चंद्रकांतचा अनोखा लग्नसोहळा; भारतीय नृत्यशैलीतून कलात्मक विवाह बंधनातं पडले कलाकार जोडपे.

पुणे पुरंदर :(प्रतिनिधि ) लग्न म्हणजे दोन जीवांच्या आशा-आकांक्षांचं सुंदर घर… पण काहीजण ते अधिक अर्थपूर्ण, कलात्मक आणि प्रेरणादायी बनवतात. असाच एक आगळावेगळा विवाहसोहळा पुण्यात पार पडला, ज्याने संपूर्ण कला क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं.

आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम नृत्यांगना वैष्णवी ढोरे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता-निर्माता चंद्रकांत राऊत यांनी पारंपरिक रूढींना फाटा देत, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या साक्षीने विवाहबंधनात अडकत एक नवा आदर्श निर्माण केला. पुण्यातील कुडजे येथील झपुर्झा आर्ट स्टुडिओमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला. झगमगाट आणि अवाजवी खर्च टाळत, या जोडीने स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह नोंदणी केली आणि १३ वर्षांच्या मैत्रीचं सुंदर सहजीवनात रूपांतर केलं.
नृत्यातून व्यक्त झालेली प्रेमकहाणी
या विवाहसोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते वैष्णवीचं भरतनाट्यम सादरीकरण. तिने अलरीपु, वर्णम, ‘सखी हे’, जयदेव आणि तिलाना हे प्रकार सादर करत आपल्या कलेद्वारेच साखरपुडा आणि भावना व्यक्त केल्या. घुंगरांच्या नादात आणि पारंपरिक पेहरावात रंगलेला हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
संघर्षातून घडलेली नृत्यसाधना
वैष्णवीचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर आजी-आजोबांनी तिचं संगोपन केलं. २०१५-१६ मध्ये डॉ. स्वाती दैठणकर यांच्याकडे तिने नृत्याचे धडे घेतले. पुढे प्रसिद्ध नृत्यांगना रमा वैद्यनाथन यांनी तिची जिद्द ओळखून तिला मार्गदर्शन केलं. गेल्या दशकभरापासून ती दिल्लीत राहून नृत्यसाधना करत असून अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे.
चंद्रकांत राऊतचा कलात्मक प्रवास
चंद्रकांत राऊत यांनी रेगे, मुळशी पॅटर्न, परीस यांसारख्या चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ख्वाडा चित्रपटाचे ते सह-निर्माते आहेत. लवकरच त्यांचा हैदराबाद कस्टडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनयासोबतच त्यांनी सेंद्रिय शेतीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निसर्ग संवर्धनाचा संदेश
या विवाहसोहळ्याला सामाजिक जाणीवेची जोड देत, उपस्थित ५०० हून अधिक पाहुण्यांना विविध प्रकारच्या बियांचे वाटप करण्यात आले. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत त्या बिया लावण्याचे आवाहन करण्यात आले.या सोहळ्याला रमा वैद्यनाथन आणि ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्यासह कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कलेला आणि निसर्गाला प्राधान्य देणारा हा विवाह आधुनिक पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here