पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्यस्तरीय समिती स्थापन; जयकुमार रावल अध्यक्ष
मुंबई : प्रतिनिधी
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
ही समिती विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून पात्र मान्यवरांची नावे केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी राज्य शासनाला सादर करणार आहे.
समितीमध्ये हसन मुश्रीफ, दादाजी भुसे, डॉ. उदय सामंत, पंकजा मुंडे, आदिती तटकरे आणि शिवेंद्रसिंह भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या समितीच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींना पद्म पुरस्कारांसाठी योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

