CID कार्यालयात अधिकारीच गैरहजर; अजितदादांच्या विमान अपघात तपासावर प्रश्नचिन्ह – रोहित पवार
मुंबई : अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी Criminal Investigation Department (CID) कार्यालयात गेलो असता एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता, असा गंभीर आरोप आमदार Rohit Pawar यांनी केला आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताला तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज तपासाची माहिती घेण्यासाठी तसेच स्वतःकडील माहिती देण्यासाठी ते CID कार्यालयात गेले होते. मात्र, तेथे एकही अधिकारी हजर नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वीच्या दोन भेटींमध्ये पहिल्यांदा तीन अधिकारी, दुसऱ्या भेटीत एक अधिकारी उपस्थित होता. मात्र, तिसऱ्या भेटीत एकही अधिकारी उपस्थित नसल्याने तपासाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे पवार यांनी सांगितले. “कदाचित पुढील वेळेस आम्हाला गेटवरच कागदपत्रे जमा करावी लागतील की काय,” अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
या प्रकारामुळे CID खरोखरच या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहे का, तसेच तपास निष्पक्षपणे होऊन अजितदादांना न्याय मिळेल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्याच्या प्रकरणात अशी परिस्थिती निर्माण होणे अत्यंत निराशाजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असतानाही पवार यांनी प्रतीकात्मकरीत्या रिकाम्या खुर्चीकडे निवेदन सादर केले. तसेच या अपघाताचा तपास तांत्रिक आणि गुन्हेगारी दोन्ही अंगांनी वेगाने करण्याची मागणी केली.
यासोबतच Bharatiya Nagarik Suraksha Sanhita 2023 (BNSS) च्या कलम १८० अंतर्गत आपला जबाब नोंदवून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


