मसाजोग सरपंच पोटनिवडणूकीत स्वरूपानंद देशमुख विजयी, आश्विनी देशमुख पराभूत
बीड : Beed जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत तब्बल ८४ टक्के मतदान झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. मात्र, गावकऱ्यांनी अनपेक्षित कौल देत सत्तांतर घडवून आणले.
विजयानंतर स्वरूपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांच्या आईंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता, त्यांनी “तू गुलाल का उधळला? ती तुझी बहीण नव्हती का?” असा बोचरा सवाल करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रसंगाने वातावरण काही काळ गंभीर झाले.
दरम्यान, निवडणुकीदरम्यान पैशाचा वापर आणि राजकीय दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, “या सर्व प्रयत्नांना मतदारांनी नाकारले आणि मला साथ दिली,” असे विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितले.
या निकालानंतर मसाजोग गावातील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


