जयगड बंदरातून कृषी व मत्स्य निर्यातीला चालना
नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई : Jaigad Port येथून कृषी व मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला गती देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील काजू, हापूस आंबा आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतसाखळी व्यवस्था आणि निर्यात प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
कोकणातील शेतकरी, काजू उत्पादक, आंबा उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संबंधित उत्पादकांमध्ये या प्रकल्पाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून जयगड निर्यात प्रकल्प प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.


